चरित्र

श्री. देवेंद्र फडणवीस

श्री. देवेंद्र गंगाधराव फडणवीस हे महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. . बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. राजकारण हे सामाजिक, आर्थिक बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे असा मा. मुख्यमंत्री महोदयांचा दृढ विश्वास असून, आजपर्यंतची त्यांची २५ वर्षांची राजकीय कारकिर्द पाहता त्यात त्यांची हीच विचारधारा ठळकपणे दिसून येते.

श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रभागी ठेवून सेवाभावी वृत्तीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले आहे. आपल्या राजकीय पक्षाने दिलेल्या तसेच नागपूरमधील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी विविध भूमिका पार पाडल्या आहेत. १९९२ व १९९७ मध्ये त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून नागपूर महानगरपालिकेत काम केले आहे. श्री. देवेंद्र फडणवीस हे भारतातील २ क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर होते. तसेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर देखील ते नागपूरमधून निवडून गेले होते. १९९९ पासून आतापर्यंत ४ वेळा त्यांची जनतेद्वारा विधानसभेवर नेमणूक झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे कार्यरत असताना त्यांनी विविध समित्यांवर काम पाहिले होते.

धोरणांची अभ्यासू आखणी, समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे समाधान शोधणे आणि तंत्रज्ञानाचा आदी योग्य वापर- हे त्यांच्या ३६० डिग्री दृष्टीकोनासह परिणामकारक परिवर्तनशाली महाराष्ट्राच्या स्वप्नाचे तीन स्तंभ आहेत. जलयुक्त शिवार सारखा महत्त्वकांक्षी प्रकल्प ज्याचा उद्देश आहे २०१९ पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे. हा बदल एका अश्या परिस्थितीत त्यांना घडवायचा आहे, जेव्हा संपूर्ण राज्यात दुष्काळाने हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि गेल्या काही वर्षांतील त्यांची मेहनत उदाहरण आहे की एक नेता म्हणून त्यांचे मिशन कश्या प्रकारे जनतेची सेवा करणे आणि त्यांना शाश्वत उपायांसह सक्षम करणे असे आहे. त्यांच्या दमदार कार्यकाळात आणि त्यांच्या निरंतर प्रयत्नांनी गुंतवणुकीला आणि उद्योगक्षेत्राला फार मोठी चालना मिळाली आहे, महाराष्ट्र राज्याने २०१६ ह्या वर्षात देशात आलेल्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी तब्बल ५०% गुंतवणूक आपल्याकडे वळवून घेतली. त्यांनी यशस्वीरित्या सेवा कायदा अधिकाराची अंमलबजावणी केली, सर्वच सरकारी लाभ जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचावेत म्हणून अश्या प्रकारचा पहिलाच प्रयत्न संपूर्ण देशामधून महाराष्ट्रात करण्यात आला होता ज्याचा उद्देश राज्यामध्ये सर्वोत्तम प्रशासन स्थापन करणे हा होता. ३९३ सेवा ऑनलाईन आणण्यात आल्या आणि हा अधिकार जनतेच्या सेवेमध्ये रुजू केल्यापासून केवळ काहीच महिन्यांमध्ये तब्बल २ करोड नागरिकांना त्याचा लाभ घेतला. प्रशासनामध्ये आणि धोरणांच्या आखणीमध्ये तरुणांना सहभागी करण्याच्या विचारामुळे श्री. फडणवीस ह्यांच्या नेतृत्वामध्ये नव्या दमाचा दृष्टीकोन आणि उर्जा पाहायला मिळते

एक अनुभवी लोक प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय मुत्सद्देगिरी व कौशल्य हे गुण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक चर्चासत्रांत नावाजले गेले आहेत. त्यांना आजवर कॉमनवेल्थ संसदीय मंडळाचा 'सर्वोत्तम संसदपटू' यांसारखे विविध प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये त्यांना विदर्भातील कार्यासाठी आणि सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील त्यांच्या भरीव कार्यासाठी प्रसिद्ध व प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘नागभूषण’ या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

विविध आर्थिक विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी करणारे एक विवेकवादी नेतृत्व अशी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची जनमानसात ख्याती आहे. शाश्वत विकास या विषयातील त्यांची रुची व अभ्यास लक्षात घेऊन हवामान बदल व ऊर्जा सुरक्षेसंदर्भातील अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांना त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ग्लोबल पार्लिमेंटेरीयन फोरम ऑन हॅबिटॅट फॉर एशिया रिजन या संस्थेच्या सचिवपदी देखील त्यांची निवड झाली होती. महाराष्ट्रातील सामाजिक-आर्थिक विकासासाठी केलेल्या मोठ्या सुधारणांसाठी त्यांना जपानमधील ओसाका सिटी विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ही पदवी बहाल करण्यात आली. या पदवीसाठी निवड झालेले ते पहिलेच भारतीय आहेत.

मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व सध्या त्यांच्याकडे गृह, सामान्य प्रशासन, शहरी विकास, कायदा व न्याय, बंदरे विकास, माहिती व जनसंपर्क इत्यादी खात्यांचा पदभार आहे.

श्री. देवेंद्र फडणवीस यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या: www.devendrafadnavis.in

Minister of CMO